भाजपचे जहाज भरकटले, अजित पवारांना चांंडाळ चौकडीने घेरले; आता शहराच्या नेतृत्वासाठी रोहित पवारच सक्षम चेहरा

पिंपरी(वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातल्याने शहर “हाय अलर्ट”वर आलेले आहे. गेली अनेक वर्षे नेतृत्वाविना भरकटणारे पिंपरी-चिंचवडचे राजकारण रोहित पवार यांच्या एंट्रीने अक्षरशः ढवळून निघाले आहे. शहराच्या राजकारणातील तरूण पिढी रोहित पवार यांच्याकडे भविष्यातील भक्कम नेतृत्व म्हणून पाहू लागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची (अजित पवार गट) राजकीय डोकेदुखी वाढली आहे.
राष्ट्रवादीत दोन गट निर्माण होऊन अजित पवार गटाने भाजपसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची राजकीय नाव भरकटलेली होती. पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला असल्याने या शहरात शरद पवार गट केवळ नावापुरताच राहिल, अशी राजकीय अटकळ बांधली जात होती. मात्र ती खोटी ठरण्यासारखी राजकीय परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. कारण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे.
रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या शरद पवार गट अध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची निवड करून लगेच कामालाही सुरूवात केली आहे. त्यांच्या दमदार एंट्रीने शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. रोहित पवार यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांना पहाटे तीन वाजेपर्यंत भेटी दे आपला राजकीय इरादा स्पष्ट केला आहे. पहाटे तीन वाजता सुद्धा त्यांचे प्रत्येक ठिकाणी त्याच जल्लोषात स्वागत केले गेल्याचे चित्र समोर आले आहे. शहराच्या राजकारणात पहाटेपर्यंत गणेश मंडळांना आजपर्यंत कोणत्या नेत्याने भेटी दिल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शहराच्या राजकारणात पहिल्याच प्रयत्नात अक्षरशः बाजी मारल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीत अस्वस्थता
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अनेक आश्वासक चेहरे आहेत. अनेकांमध्ये शहराच्या राजकारणात काही तरी करण्याची उर्मी आहे. मात्र त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व मिळत नसल्याचे शहराच्या राजकारणातील वास्तव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचे अनेक वर्षे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीतील काही बडव्यांनी कायम घेरलेले दिसले. दोन-चार नेते सांगतील त्यानुसारच अजित पवार यांनी शहराचे राजकारण केले. त्यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून आपले पुत्र पार्थ पवार यांना मैदानात उतरवून शहराच्या राजकारणात आणले. मात्र गेली पाच वर्षे पार्थ पवार शहराकडे साधे फिरकले सुद्धा नाहीत. शहरातील सामान्यांना पार्थ पवार यांचा चेहरा आता आठवत सुद्धा नाही, अशी राजकीय स्थिती आहे.
आजही अजित पवार दोन-चार जणांच्या सांगण्याबाहेर जाऊन शहरात पक्षवाढीसाठी काम करत असल्याचे चित्र नाही. शहराच्या राजकारणात “बंटी आणि बबली” अशी ओळख निर्माण झालेल्या एका जोडगोळीने शहर राष्ट्रवादीचा ताबा घेतल्यासारखे चित्र आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे “बंटी आणि बबली”ची खुद्द अजित पवार यांनाही भुरळ पडल्याचे दिसत आहे. ही जोडगोळी ज्या पक्षासोबत असते त्या पक्षाची पुढे जाऊन अधोगती होते, हा या शहराच्या राजकारणाचा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता आहे.
भाजपचे जहाज सुद्धा भरकटलेले
दुसरीकडे शहर भाजपमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा शहराच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा दबदबा होता. थेट अजित पवार यांना भिडण्याची जगताप यांच्यात राजकीय क्षमता होती. आता त्यांच्यासारखा एकही नेता भाजपमध्ये नाही. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाकडे कायम संशयानेच पाहिले गेले आहे. त्यांनीही आपल्या नेतृत्वाविषयीचा संशय दूर होईल, असे राजकारण केल्याचे कधी दिसले नाही. महेश लांडगे म्हणजे केवळ सोशल मीडियावरचे नेतृत्व असे राजकीय समीकरण बनत चालले आहे. प्रत्यक्ष मैदानावरची परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर भाजपचे नेतृत्व महेश लांडगे यांना मिळू शकले नाही. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याकडे भाजपने शहराचे नेतृत्व दिले आहे. त्यांचे नेतृत्व लगेच मान्य होईल, अशी स्थिती दिसत नाही. त्यांना अजून बरेच काही शिकण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याही नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे शहरातील भाजपचे जहाज सुद्धा भरकटल्यासारखेच आहे.
रोहित पवारांच्या नेतृत्वाचा तिसरा मजूबत पर्याय
शहरातील अनेकांना भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन राजकीय पक्षांशिवाय तिसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे ते गपगुमान या दोन्ही पक्षाचे आजपर्यंत काम करत होते. मात्र आता रोहित पवार यांच्या रुपाने शहरात तिसरा मजबूत नेतृत्वाचा पर्याय निर्माण झाला आहे. रोहित पवार यांची तरूणाईत चांगली क्रेझ आहे. त्यंच्यात नेहमी एक प्रकारची राजकीय परिपक्वता दिसते. राज्याच्या राजकारणातील भविष्यातील एक मोठे नेतृत्व म्हणून आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. शहरातील अनेक तरूण कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत केवळ नावाला राहिलेले शहरातील अनेकजण रोहित पवार यांचे नेतृत्व स्वीकारल्यास आश्चर्य वाटायला नको. तसे झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात शरद पवार गट मजबूत होणार आहे. तशीच राजकीय चिन्हे दिसत असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. हे दोन्ही पक्ष रोहित पवार यांना कसा शह देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.