बातम्या

अखेर रुग्णालयाला लागले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव; आयोगाच्या नोटीसनंतर आयुक्तांना आली जाग

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयाचे नाव हटविल्या प्रकरणी महापालिका आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. नोटीस आल्यानंतर महापालिकेने तात्काळ पिंपरी वाघेरे येथील रुग्णालयास ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय’ हे नाव दिले आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी तक्रार केली होती.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, महापालिकेच्या पिंपरी वाघेरे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयाचे रंगकाम करण्यात आले होते. यावेळी रंग कामात रुग्णालयाचे नाव हि हटविण्यात आले होते. रंगकाम पूर्ण होऊन देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव रुग्णालयास देण्यात आले नव्हते. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करत पाठपुरावा केला होता.

परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत ‘रुग्णालयाला दिलेले बाबासाहेबांचे नाव बदलल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आयोगाला कळविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. अखेर महापालिका प्रशासनाला चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ पिंपरी वाघेरे येथील रुग्णालयास ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय’ नाव देण्यात आले आहे.

Share this: