बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

डॉ.बाबासाहेबांचे नाव हटवणे पडले महागात;आयुक्त शेखर सिंह यांना थेट आयोगाची नोटीस

पिंपरी(वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी वाघेरे विभागात ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय’ हे रुग्णालयाचे नाव हटवून केंद्र सरकारच्या योजनेचा फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासना विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना नोटीस बजावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून पिंपरी वाघेरे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली, यावेळी सदर इमारतीला असणारे बाबासाहेबांचे नावालाही पुसण्यात आले. पूर्ण काम झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयाला बाबासाहेबांचे नाव देणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदीर’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करीत पुन्हा रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली होती परंतू अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यामुळे दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासना विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, “मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय” हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तुत्व खुप मोठे आहे.

परंतू केवळ महापुरुषांची जात पाहून त्यानुसार रुग्णालयाला दिलेले महापुरुषांचे नाव हटविणे हि जातीय मानसिक विकृती आहे. रूणालयाच्या इमारतीचे रंगकाम करण्यात आले. यावेळी सदर इमारतीला असणारे बाबासाहेबांचे नावही पुसण्यात आले.काम झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयाला बाबासाहेबांचे नाव देणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदीर’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला. शासनाच्या योजनेस आमचा विरोध नाही परंतू अशा प्रकारे महापुरुषाचे नाव हटविणे अत्यंत चुकीचे आहे.

या संपूर्ण प्रकारातून अधिकाऱ्यांचा सामाजिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा भंग करण्याचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत ‘रुग्णालयाला दिलेले बाबासाहेबांचे नाव बदलल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आयोगाला कळविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.

Share this: