मुख्यमंत्री आश्वासन पाळा, अन्यथा उद्योजक काम बंद करतील
वीज दरवाढ रद्द न केल्यास विधानसभेवर मोर्चा काढू…..संदीप बेलसरे
वीज दरवाढी विरोधात वीजबिलांची होळी
पिंपरी (वास्तव संघर्ष ) राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर 2016 च्या आदेशानुसार मार्च 2020 पर्यंत कायम ठेवा. 30 सप्टेंबर 2018 पासून केलेली औद्योगिक व सर्व ग्राहकांची अन्यायकारक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करा. सरकारने सप्टेंबर 2018 ते मार्च 2020 च्या वीजदर फरकाचे 3400 कोटी रुपये अनुदान महावितरणला द्या. या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 12 फेब्रुवारी) निगडीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन वीज बिलांची होळी आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर लघु उद्योग संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदन अप्पर तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, नितीन बनकर, उपाध्यक्ष संजय सातव, दिपक फल्ले तसेच प्रमोद राणे, संजय ववले, विजय खळदकर, हर्षल थोरवे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल कंक, अतुल इनामदार, शांताराम पिसाळ, सचिन आदक, महादेव कवितके, प्रमोद दिवटे, कैलास भिसे, सुरेश जपे, विजय भिलवडे, रमेश ढाके, निस्सार सुतार, प्रकाश ढमाले, बशिरभाई तरसगार, चांगदेव कोलते, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, अशोक पाटील, प्रदिप गायकवाड आदींसह शेकडों लघुउद्योजक व कामगार उपस्थित होते.
संदीप बेलसरे यांनी सांगितले की, पाच वर्षांपुर्वी अशाच प्रकारचे आंदोलन वीज ग्राहकांनी राज्यभर केले होते. त्यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे हे नाशिक येथील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे सरकार आल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची वीज दरवाढ करणार नाही असे आश्वासन दिले होते. लघु उद्योग संघटना व ग्राहकांच्या तीव्र विरोधामुळे त्यावेळीच्या आघाडी सरकारने 6 हजार कोटी रुपयांचे अनुदान महावितरणला दिले होते. त्यामुळे तेंव्हाची वीज दरवाढ रद्द करुन राज्यातील सर्व ग्राहकांना दिलासा दिला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर फरकापोटी 3400 कोटी रुपये अनुदान महावितरण देऊन महाराष्ट्रातील जनतेची होणा-या महागाईपासून सुटका करावी. अन्यथा फेब्रुवारी अखेरपर्यत वीज दरवाढ रद्द केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करुन विधानसभेवर मोर्चा काढू असा इशारा पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिला.