मावळची सत्ता रेव्ह पार्ट्यांसाठी असणार काय?; प्रकाश आबेडकरांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांवर टीकास्त्र
पिंपरी– आम्ही कोणाचे गुलाम नाही, अजित पवारांचे तर मुळीच नाही हे मावळ लोकसभा मतदारसंघाला दाखवून द्यायचे आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी मावळ मतदारसंघातील मतदारांना केले आहे. मावळमध्ये चॉकलेट पर्व सुरु असून चॉकलेट कोणाला दिले त्याचे चारित्र्य काय? उद्याची सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी असणार आहे काय? व्यसनाधीनांच्या हाती सत्ता देणार आहात का? असा प्रश्न करीत राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “निवडणूक आता या धनदांडग्यांच्या आणि नातवांचे लाड पुरवण्यासाठी झाल्या आहेत. सगळीकडे थट्टा मस्करीच सुरू आहे. आम्ही सर्व महाराष्ट्र मुठीमध्ये ठेवलेला असून मावळ मतदारसंघ हा आव्हानात्मक मतदार संघ आहे. इथे राजकीय पक्षासाठी नव्हे तर मतदारांसाठीच आव्हान आहे. आमची जहागिरी आहे जे हवंय ते करू, मुकाट्याने सांगतो ते ऐका अशी सध्या इथली परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मावळच्या जनतेला दाखवून द्यायचे आहे की आम्ही कोणाचे गुलाम नाहीत, अजित पवारांचे तर नाहीच नाही. लोकांनी यांना सत्ता दिली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र, त्यांना आता मग्रुरी आली आहे. तुम्ही आमचे मालक नाहीत आम्ही तुमचे मालक आहोत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात चॉकलेट पर्व सुरु आहे. ज्यांचे रेव्ह पार्ट्यांचे चारित्र्य आहे, त्यांना इथे उमेदवारी देण्यात आली आहे. उद्याची सत्ता रेव्ह पार्ट्या करण्यासाठी होणार आहे? व्यसनाधीनांच्या हाती सत्ता देणार आहात का? असा प्रश्न आंबेडकर यांनी यावेळी कार्यकर्त्याना केला.