बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कलाटे यांचा ‘ई-लर्निंग’ निविदेस आक्षेप म्हणजे निव्वळ स्टंटबाजी : ॲड. सचिन भोसले

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 123 शाळेतील विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’ स्कूल प्रकल्पांतर्गत देण्यात येणारी सुविधा आवश्यक आहे. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य व गुणवत्तेत वाढ होईल. मात्र बुधवारी (12 जून) झालेल्या स्थायी समिती बैठकीत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी या प्रकल्पाच्या निविदेस आक्षेप घेतला. कलाटे यांनी घेतलेला आक्षेप हा अर्धवट माहिती व निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेली ‘स्टंटबाजी’ आहे. स्मार्ट सिटी हे एसपीव्ही अंतर्गत स्वतंत्र नोंदणी झालेली कंपनी आहे. स्मार्ट सिटीला निधी खर्च करण्याबाबत व विकास प्रकल्प राबविण्याबाबत स्वतंत्र अधिकार आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळावर राहुल कलाटे यांची नियुक्ती झाली नाही. याचा राग मनात ठेवून आकस बुद्धीने कलाटे हे या निविदा प्रक्रियेला विरोध करीत आहेत. असे पत्रक नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीला विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगरपालिका निधी देत असते. निविदा मंजूर करण्याचे सर्व अधिकार एसपीव्ही-स्मार्ट सिटी संचालक मंडळास आहेत. याबाबत कलाटे यांना अपूर्ण माहिती आहे. स्मार्ट सिटी कंपनीने मागील वर्षी महानगरपालिकेच्या 13 शाळांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून ‘ई-लर्निंग’ स्कूल प्रकल्प राबविला. त्यावेळी मात्र कलाटे यांनी विरोध दर्शविला नाही. मात्र या वर्षी स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने ‘ई-लर्निंग’ प्रकल्प 123 शाळांतून राबविण्यासाठी निविदा मंजूर केली. या प्रकल्पास शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे. शिवसेना नेहमी विद्यार्थ्यांचे हित, नागकिरांना आवश्यक असणारे प्रकल्प आणि जनहिताच्या प्रकल्पांचे समर्थन करीत आली आहे. मात्र राहुल कलाटे स्थायी समितीत सदस्य असताना पक्षाची भूमिका परखडपणे मांडत नाहीत. त्यांनी ‘ई-लर्निंग’च्या निविदा प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी स्थायी समितीत विकास प्रकल्पाच्या नावाखाली सुरु असलेली शहरातील नागरिकांच्या पैशाची होणारी लूट थांबवावी व अनावश्यक प्रकल्पांना विरोध करावा, तरच ते शिवसेनेचे गटनेते शोभतील अशी टीका नगरसेवक ॲड. भोसले यांनी केली.

शहरातील मनपा शाळेत गोरगरीब, झोपडपट्टीतील व अल्प उत्पन्न गटातील, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचे पाल्य शिक्षण घेत असतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून महानगरपालिका, शिक्षणमंडळ त्यांना वेळोवेळी सुविधा पुरवत असते. याला शिवसेनेचा वेळोवेळी पाठींबा असतो. मात्र ‘ई-लर्निंग’ प्रकल्पास जर विरोध केला तर शिवसेना त्यांच्या स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी पत्रकाव्दारे दिला आहे.
—-

Share this: