‘मागोवा स्वरपर्वाचा’तून तळेगावच्या कलाकारांचा देखणा अविष्कार
पिंपरी, प्रतिनिधी :
आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा व श्रीरंग कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या गुरुपोर्णिमा महोत्सवात तळेगावचे महागुरू, गानतपस्वी स्व.शरदराव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीवर आधारित “मागोवा स्वर पर्वाचा” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरवात स्व. शरदराव जोशी रचित व संगीतबद्ध ओंकारायं परमेशोयं… या श्लोकाने झाली आणि त्यांनीच स्वरबद्ध केलेल्या रचनांच्या एकाहून एक सरस सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. गायिका वैजयंती बागुल यांनी सरस्वती रागातील तीन तालातील बंदिश सादर केली. या नंतर संपदा थिटे यांच्या शिष्यांनी भूप रागातील तराणा आणि यमन रागातील सरगम समूह स्वरात सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या आणि सगळे वातावरण संगीतमय होऊन गेले.
यावेळी श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी,प्रमुख विश्वस्त निरुपा कानिटकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेशराव धोत्रे, विश्वस्त सुरेश साखवळकर, उपाध्यक्ष गडसिंग, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्व.शरदरावांच्या सांगीतिक रचनांचा मागोवा घेणाऱ्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले.
शरदरावांनी आठ मात्रात बांधलेली गणेश वंदनेची रचना नृत्य अभ्यासक कीर्ती ढेंबे पेडणेकर यांनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. शरदरावांनी तयार केलेल्या गोरख अभोगी या अनवट रागातील बंदिश पुण्यातील संगीत अभ्यासक शुभदा आठवले यांनी सादर केली. त्यानंतर मधुरा वेलणकर यांनी श्रावण आला श्रावण आला… ही शरदरावांची सुगम संगीतातली रचना सादर केली. त्यांची शिष्या धनश्री शिंदे हिने त्यांचीच संगीत रचना असलेले मनाचे श्लोक सादर करून वातावरण भारून टाकले. शरदराव यांच्या पत्नी शीला जोशी यांनी लिहिलेले आणि शरदरावांनी संगीत बद्ध केलेले आंब्याच्या झाडावर भरली पक्षांची शाळा हे बालगीत नृत्यरसिकांची दाद मिळवून गेले.
शरदरावांनी योगिनी जोगळेकर यांच्या चैती कादंबरीवर आधारित लिहिलेल्या संगीत चैती या नाटकातील प्रवेश अक्षय देशपांडे, कौस्तुभ ओक आणि राजीव कुमठेकर यांनी सादर केला. अक्षय देशपांडेचे दमदार गायन रसिकांना खूपच भावले. त्यानंतर शरदारावांनी रचलेली रागमाला नृत्य अभ्यासक मीनल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी ऋतुदर्शन या मोहक नृत्यातून साकारली. या रागमालेचे गायन संपदा थिटे यांनी केले. मध्यंतरानंतर सादर झालेल्या बिलासखानी तोडी, चैती आणि धन्य ते गायनी कळा या संगीत नाटकांच्या नांदीच्या मेडलीने रसिकांच्या टाळ्या घेतल्या. त्यांनतर त्यांनीच सादर केलेली संगीत विलास खानी तोडी या नाटकातली गझल, बागेश्री रागातील सरगम…विनायक लिमये यांचा प्रभू नामाचा मी वाणी… हा अभंग, शरदरावांच्या रुक्मिणीगान या ध्वनी फितीतील “आम्ही दैवाचे शेतकरी… हे गीत आणि लीना परगी यांनी सादर केलेला नट भैरव रागातील रेणुके अंबे…हा गोंधळ अश्या एकापेक्षा एक रचना रंगमंचावर सादर झाल्या. जणू तळेगावचे सांस्कृतिक वैभव रंगमंचावर एकत्र आले होते आणि आपल्या गुरूला म्हणजेच कै.शरदरावांना त्यांच्याच रचनांची संगीत,नृत्य,नाट्य कला सादर करून गुरुदक्षिणा अर्पण करीत होते.
या कार्यक्रमाची सांगता ‘जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले…ही भैरवी सादर करून झाली. या कार्यकमाची संकल्पना आणि सादरीकरण तळेगावच्या नृत्य अभ्यासक मीनल कुलकर्णी व संगीत अभ्यासक संपदा थिटे यांची होती. या कार्यक्रमात ४० हून अधिक कलाकारांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला शुभदा आठवले, संपदा थिटे, प्रदीप जोशी (संवादिनी), विनय कशेळकर, मंगेश राजहंस (तबला), प्रवीण ढवळे, मंदार परगी (ताल वाद्य) यांनी संगीत साज चढविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी फाटक व राजीव कुमठेकर यांनी, तर ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर, तर प्रकाश योजना व रंगमंच रचना केदार अभ्यंकर, छाया चित्रण श्रीकांत चेपे व तंत्र सहाय्य समीर नरवडे यांचे होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंगच्या कांचन सावंत, विनय कशेळकर, विश्वास देशपांडे, दीपक आपटे, सीमा आवटे, प्रदीप जोशी, लक्ष्मीकांत धोंगडे, सुनील सोनार, नाट्य परिषदेचे नितीन शहा, राजेश बारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.