भोसरीतील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना बांधकाम कामगारांचा जाहीर पाठिंबा
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विलास लांडे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुकीत लांडे यांचा भरघोस मतांनी विजय होण्यासाठी मतदारसंघातील सर्व बांधकाम कामगार त्यांच्या पाठीशी असल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष गणेश आवारे यांनी विलास लांडे यांना दिले आहे.
या पाठिंब्यासंदर्भात गणेश आवारे म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघात शेकडो बांधकाम कामगार आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. उलट या बांधकाम कामगारांचे शोषण करण्याचेच काम झाले. या बांधकाम कामागारांची शोषणातून मुक्तता करून त्यांचे जीवनमान उंचावणारे प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे हेच योग्य प्रतिनिधी आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सर्व बांधकाम कामगारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार माजी आमदार विलास लांडे यांना बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेकडून जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व बांधकाम कामगार हे कपबशी या चिन्हावर मतदान करून विलास लांडे यांना भरघोस मतांनी निवडून आणतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.