बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नार्को टेस्ट करा; कलाटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या व भाजप पक्षाची सत्ता आली.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली. श्रावण हर्डीकर यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून कायमच वादाचा विषय झालेला आहे. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरलेले आहेत. त्याबाबत विरोधकांबरोबरच सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविला. पत्र निवेदने दिली तरी त्यांनी त्यावर खुलासा न करता केराची टोपली दाखविली. त्यामुळे त्यांच्या कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे. शहरातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा देण्याबाबत ते अपयशी ठरले आहेत. त्यांचे प्रशासनावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत आहेत व त्याचा त्रास शहरातील जनतेला होत आहे.त्यांनी घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनीही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते आरोप त्यांनी खोडून न काढता कुठल्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा आजतागायत दिलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध होते.

महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे, असे दिसून येते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नार्को टेस्ट करावी. तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून जे आर्थिक निर्णय घेतलेले आहेत, त्याबाबत सक्षम समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी, असे या निवेदनादत कलाटे यांनी म्हटले आहे

Share this: