दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमधील अनेक कुटुंबे गावी गेली ;चोरट्यांनी लाखो रुपयांची घरफोडी केली
पिंपरी (वास्तव संघर्ष) हल्ली चोर कधी घरात घुसून चोरी करेल सांगता येत नाही पिंपरी-चिंचवड शहरात दरवाजा उघडा असताना कडीकोयंडा च्या साथीने आत शिरून चो-या केलेली घटना ताजी असताना दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमधील अनेक कुटुंबे गावी गेली आहेत. त्याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी घरे फोडत सोने-चांदीचे दागिने, रोकड असा चोरून नेला. गेल्या तीन दिवसांत शहरात पाच घरफोड्यांत चोरट्यांनी आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी सुरेश बापू चव्हाण (वय ५०, रा. क्रांतिनगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण कुटुंबीय २३ ऑक्टोबरला बाहेरगावी गेले होते. २६ ऑक्टोबरला ते परत आले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले ५१ ग्रॅम सोन्याचे आणि २० ग्रॅम चांदीचे दागिने असा १ लाख ५३ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला.चिंचवड लक्ष्मीनगर येथील चोरीप्रकरणी चंदनकुमार मिश्रा (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिश्रा कुटुंबीय २८ ऑक्टोबरला दुपारी सव्वातीन वाजता बाहेर गेले होते. रात्री साडेआठ वाजता ते घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली.थेरगाव येथील घरफोडीप्रकरणी तानाजी मोतीराम जाधव (वय ३४, रा. ओंकार कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव कुटुंबीय २७ ऑक्टोबरला रात्री पावणेबारा वाजता बाहेर गेले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील १७ ग्रॅम सोन्याचे आणि ४० ग्रॅम चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. जाधव कुटुंबीय दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता घरी आले असता हा प्रकार निदर्शनास आला
निगडी-प्राधिकरणातील घरफोडीप्रकरणी भरत सुदाम भसे (वय ४४, रा. रस्टन कॉलनी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भसे कुटुंबीय २६ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता त्यांच्या सांगुर्डी या मूळ गावी दिवाळीसाठी गेले होते. त्यांची अॅक्टिव्हा दुचाकी घराच्या भिंतीलगत त्यांनी उभी केली होती. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, लॅपटॉप, कागदपत्रे, घरात ठेवलेली अॅक्टिव्हा दुचाकीची चावी चोरली. जाताना घराबाहेर उभी केलेली अॅक्टिव्हा घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला.बावधन येथील घरफोडीप्रकरणी अविनाश रोहिदास काकडे (वय ३८, रा. सुरभी एन्क्लेव्ह, नागरस रोड, औंध) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
२६ ऑक्टोबरला सकाळी ११ ते २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी सहादरम्यान चोरीचा प्रकार घडला. काकडे कुटुंबीय गावी गेले होते. या वेळी चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप आणि लाकडी दरवाजाचे लॅच लॉक तोडून शयनगृहातील लाकडी व लोखंडी कपाटे उचकटून साहित्य अस्ताव्यस्त केले, तसेच ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे १७ तोळे दागिने चोरून नेले