भोसरीत गॅसच्या गळतीमुळे स्फोट; तीनजण गंभीर जखमी
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- सिलेंडरमधून रात्रभर गॅस गळती झाली. सकाळी गॅस सुरू करताना मोठा स्फोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडली.
मनीषा माऊली साळुंखे (वय ३५), माऊली साळुंखे (वय ४०), सिद्धार्थ साळुंखे (वय १३, सर्व रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, दिघी रोड, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर शाळेजवळ साळुंखे कुटुंब एका इमारतीमध्ये छोट्या खोलीत भाड्याने राहतात. साळुंखे यांच्या गॅसमधून रात्रभर गळती झाली. तसेच थंडीमुळे दरवाजा खिडक्या बंद असल्याने गॅस खोलीत साठून राहिला. बुधवारी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मनिषा यांनी लाईटचे बटन सुरू केले असावे किंवा गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला असावा. त्यामुळे अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील साहित्याने पेट घेतला तसेच मनीषा साळुंखे आणि त्यांचे पती माऊली साळुंखे व मुलगा सिद्धार्थ साळुंखे हे तिघेजण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे सब ऑफिसर नामदेव शिंगाडे, विकास नाईक, विठ्ठल भुसे, कुंडलिक भुतापल्ले, सुरज गवळी, शांताराम घारे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. जखमींवर वानवडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत