आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

खुशखबर! पिंपरी चिंचवडमधील सात बालकांनी केली कोरोनावर यशस्वी मात

File Photo

पिंपरी(वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागाच्या डाॅक्टरांच्या पथकाला यश आले.कोरोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना पिंपरी चिंचवड शहरातील २ ते १२ वर्षे वयोगटातील ७ बालकांनी कोरोनावर मात केली.आज २ मे २०२० रोजी यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले.

१६ व १७ एप्रिल रोजी ही ७ कोरोनाग्रस्त बालके बालरोग विभागात या रूग्णालयात दाखल झाली होती.त्यामध्ये रूपीनगर निगडी मधील ५ बालकांचा व भोसरीतील २ बालकांचा समावेश होता.या बालकांना वेळोवेळी सर्व उपचार देवून १४ दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले.यापैकी दोन बालकांवर कोरोनाचे उपचार चालू असतांना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण ३०००० व ६६००० असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते.सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण १५०००० च्या वर असते.त्यासाठी या बालकांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले.त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते.

माता व बालकांच्या १४ दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले.बालरोग विभागातील डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर,अधिष्ठाता डाॅ राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डाॅ अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगीरी करता आली.बालरोग विभाग प्रमुख डाॅ दिपाली अंबिके,डाॅ सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डाॅक्टर्स,स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाला.

Share this: