बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे लक्ष घालण्याची मागणी

पिंपरी(वास्तव संघर्ष ) – चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिकांचे क्वारंटाइनच्या मुद्द्यावरून सामाजिक शोषण सुरू झाले आहे. याप्रकरणात तातडीने लक्ष घालून या नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड युवक वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे येथील गोरगरीब नागरिकांना अन्यत्र हलविण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा परिसर दाट वस्तीचा असल्याने महापालिका प्रशासनाने येथील नागरिकांना निगडी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयात हालवून तेथे क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी या महाविद्यालयात झोपडपट्टीतील नागरिकांना क्वारंटाईन करण्यास विरोध केला आहे. दोन्ही नगरसेवक त्यांच्या कार्यकर्त्यांसह रस्त्यांवर ठाण मांडून बसले आहेत.

आनंदनगर झोपडपट्टी परिसरात अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या गरिबांची संख्या जास्त असून तेथील नागरिकांना हेतुपुःरस्पर दृष्टिकोनातून असमानतेची व भेदभावाची वागणूक देऊन विरोध करत आहेत. आनंदनगर भागाचे भाजप नगरसेवक, महापौर, आयुक्त यांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे असलेले नगरसेवक देखील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे शोषण व्हावे या हेतूने प्रेरित होऊन विरोध करीत आहेत.

या नागरिकांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या व्यक्तिगत व जीविताचे स्वातंत्र्य असलेल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात त्वरित जातीने लक्ष घालून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती प्रभावी नियोजन करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत, अशी मागणी पानपाटील यांनी केली आहे.”

Share this: