साई चौकातील” छत्रपती संभाजी महाराज ” दुहेरी उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला;अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी (वास्तव संघर्ष ) रहाटणी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नवनगर विकास प्राधिकरण यांनी उभारलेल्या ” छत्रपती संभाजी महाराज ” दुहेरी उड्डाण पुलावरील औंध ते काळेवाडीकडे जाणारा मार्ग आज वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते तथा स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार यादव , पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, प्राधिकरणचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी भगवान घाडगे, उपअभियंता वसंत नाईक, पालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवने, प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नाना काटे म्हणाले कि, साई चौकात नेहमीच वाहनाची वर्दळ असते. हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिकांना व वाहनचालकांना याचा त्रास होत होता. स्थानिक नगरसेवक या नात्याने मी व नगरसेविका शितल काटे आम्ही वेळोवेळी नवनगर विकास प्राधिकरणाकडे हा उड्डाणपूल नागरिकासाठी खुला करण्यासाठी पाठपुरावा केला. अपूर्ण राहिले लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांना खुला करावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.
आज साई चौकातील ” छत्रपती संभाजी महाराज ” दुहेरी उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला करण्यात आल्यामुळे या ठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला आहे. पिंपळे सौदागर व रहाटणीकडे तसेच पुण्याला व हिंजवडी आयटी पार्कला जाणारे नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. स्थानिक नगरसेवक नाना काटे व शितल काटे यांच्या पाठपुराव्यामुळे हा पूल नागरिकांसाठी खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.