तब्बल 90 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पिंपरी चिंचवड पोलिसांनी एटीएम मशीन चोरट्यांचा लावला छडा
पिंपरी (वास्तव संघर्ष) काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधील थरमॅक्स चौकातून आयसीआयसीआय बँकेचे एटीएम चोरून नेले होते.पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी सलग पाच दिवस अहोरात्र मेहनत घेत या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. दोन सराईत चोरट्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय 20, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर), शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (वय 23, रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर विशेष तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार पोलिसांनी वाहन, वाहन मालक, चोरीचा मार्ग असा विस्तृत तपास सुरु केला.
दरम्यान, 8 जून रोजी होळकरवाडी, औताडेफाटा येथून एक पिकअप चोरीला गेली असून त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम मशीन चोरण्यात आले होते.त्यामुळे पिकअपच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता पिकअप मालकाने त्यांचे पिकअप वडकी फाटा, सासवड रोड येथे मिळून आल्याचे सांगितले.त्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपासाची चक्रे फिरवली. तब्बल 90 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला.हडपसर येथील महात्मा फुले नगर भागात सापळा लावून पोलिसांनी आरोपी अजयसिंग, शेऱ्या आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.