पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस ;नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन
पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे . बुधवारी सकाळपासूनच हलक्या सरींना सुरवात झाली . दुपारी काही भागात जोरदार सरी कोसळल्या . त्यामुळे पुणे – मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यासह शहराच्या सखल भागातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले होते .
काही ठिकाणी सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या खोदकामांमुळे चिखलही निर्माण झाला होता . पवना नदीकाठच्या पिंपरीतील सुभाषनगर , आंबेडकरनगर , संजय गांधीनगर , चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर दापोडी येथील नदीकाठच्या परिसरापर्यंत पुराचे पाणी आले होते .
हवामान विभागाने गुरुवारपर्यंत ( ता . 6 ) पुणे परिसरात अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे . या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापान व अग्निशामक विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . नदी काठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची व्यवस्था केलेली आहे . नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिले आहे.