प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिका-यावरील अतिरीक्त कामाचा ताण वाढला
बारामती: गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्या अनुषंगाने पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईक व इतर रूग्णांच्या तपासणीसाठी विलंब होऊ नये म्हणून रूई ग्राणीण रूग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथे रूग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत.
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे दि.१४ आँगस्ट २०२० पासून स्वॅब सँपलिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे.सदर ठिकाणी कार्यरत असणारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे त्यांचे मुळ आस्थापनेवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम सांभाळून त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वॅब घेण्याचे काम करीत आहेत.एकूण ७ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रोज चक्राकार पद्धतीने येथे ड्युटी करत आहेत.
रोज साधारणत: ९० ते १०० रूग्णांचे स्वॅब घेण्याचे काम तसेच स्वॅब घेण्या बरोबरच,रूग्णांच्या नावांची नोंद करणे, VTM लेबलींग, सॅम्पल घेवून ते पॅक करणे व फॉर्म घेवून ते तपासणीला पाठवणे, स्वाब घेणार्या सहकारी प्रयोगशाळा अधिकार्यांना स्वॅब घेताना सहकार्य करणे असे विवीध जबाबदारीपुर्वक कामे हे अधिकारी चोख पध्दतीने पार पाडत आहेत. यापूर्वी ही सदर अधिकारी यांनी रुई येथे जुलै पासून काम केले आहे. स्वतः चा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून हे अधिकारी अक्षरशः वाघाच्या जबड्यात हात घालून काम करतात. तीन महिन्याच्या बाळांपासून ते ९० वर्षाच्या वृद्धांपर्यंत स्वाब घेताना त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
या कालावधीत त्यांना काही रूग्णांच्या अरेरावीला सुध्धा सामोरे जावे लागत असल्याचे ही चित्र आहे.
सध्या या कार्यरत असणार्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांवर अतिरीक्त कामाचा ताण वाढला आहे.आज दि.२९ आँगस्ट रोजी तब्बल १५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.रोज वाढती रूग्ण संख्या व अतिरीक्त कामामुळे अधिकार्यांना मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे.