पत्रकारांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांचे मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन
सर्व पत्रकारांना 50 लाखांचा विमा तात्काळ मंजूर करावा
मुंबई : महाराष्ट्रातील सर्व रूग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करून कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांचा विमा मंजूर करावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
पत्रकार पांडूरंग रायकर, यांच्यासह लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी, बीडचे पत्रकार भोसले या पत्रकारांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पत्रकार कोविड योद्धा म्हणून कोरोना काळात घराघरात बातमी पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.अशा पत्रकारांना महाराष्ट्रातील धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणा-या खासगी रूग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी. कोरोनामुळे मृत पावलेले पत्रकारांच्या कुटुंबियांना त्वरीत 50 लाखांचे विमा कवच देण्यात यावे. कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांना मा. आरोग्यमंत्री यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात जाहिर केल्याप्रमाणे 50 लाखांचे विमा कवच त्यांच्या कुटुंबियांना द्यावे. सर्व पत्रकारांना प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था केल्यास पत्रकारांवर लवकर उपचार होणार आहेत.
यासाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची अट नसावी तर सरसकट पत्रकारांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी आणि पत्रकारांना वेळेवर अॅम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करूण देण्याची सूचना आरोग्य विभागास देण्यात यावी. लातूरचे पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्यू आणि पत्रकार पांडूरंग रायकर यांना वेळेवर अॅम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू ही खेदजनक भावना महाराष्ट्रतील सर्व पत्रकारांच्या मनात निर्माण झाली आहे.यापुढे दुसरा गंगाधर सोमवंशी किंवा पांडूरंग रायकर निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपल्या आरोग्य विभागाने घ्यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.