पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कंत्राटी कामगारांना दुप्पट बोनस देण्यात यावा;आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे कामगार वर्गावर आलेल्या आर्थिक टंचाई व बिकट परिस्थितीमुळे कामगार आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना दुप्पट बोनस देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खास करून आरोग्य विभागाचे कचरा वाहतूक व ठेकेदारी पद्धतीत काम करणाऱ्या वाहन चालक व मदतनीस यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी काम करत आहेत, या सर्व बाबी लक्षात घेऊन श्रमिक 1926 कायद्यानुसार महापालिकेच्या सर्व कामगारांना शंभर टक्के बोनस दिला जातो.
परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व कंत्राटी कामगारांना दुप्पट बोनस आणि पूर्ण वेतन देण्यात यावा, अशी विनंती महापालिका आयुक्त, महापौर, आरोग्य अधिकारी, कामगार आयुक्त, विरोधी पक्षनेते, व इतर मान्यवरांना संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष लोकशा जाणवेकर, शहर अध्यक्ष अविनाश बनसोडे, उपाध्यक्ष सुधीर जेटीथोर, कार्याध्यक्ष निलेश काळे, सचिव गणेश नागवडे, सल्लागार संगीता बोराटे, महासचिव शांतीताई गवळी, जयश्री साळुंके, अमोल ढोले, अतुल शिरसागर, संजय भिसे, अमोल कांबळे व इतर सदस्यांमार्फत करण्यात आली आहे.