गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूसासह एका सराईत गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतूसासह एका सराईत गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
आकाश मल्लाप्पा जमादार (वय 25, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक स्वप्नील भरत शेलार यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे रावेत रोडवर एक तरुण पिस्टल घेऊन आल्याची माहिती पोलीस नाईक स्वप्नील शेलार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रावेत रोडवर सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आकाश पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा 40 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करत आकाशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.आरोपी आकाश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सशस्त्र दरोड्याची तयारी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे तीन गंभीर गुन्हे सांगवी, देहूरोड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त नंदकुमार पिंजण, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव, निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, विजयकुमार आखाडे, अमोल माने, नितीन राठोड, पंकज भदाणे, गोविंद डोके, सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे