पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सहा सहाय्यक आयुक्तांची ‘उपायुक्तपदी’ बढती
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहा सहाय्यक आयुक्तांची ‘उपायुक्तपदी’ बढती करण्यात आली आहे. प्रतिनियुक्तीवरील असलेले राज्य सेवेतील सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, स्मिता झगडे, पालिका सेवेतील आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर आणि संदीप खोत यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने यावर 12 ऑक्टोबर 2020 रोजी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहा सहाय्यक आयुक्तांची उपायुक्तपदी बढती झाल्याचा आदेश पारित केला आहे. दरम्यान, आता पालिकेतील सहा सहाय्यक आयुक्तपदे रिक्त झाली आहेत.
पिंपरी महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. पालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली असून नवीन आकृतीबंधानुसार सात उपायुक्तांच्या पदाची निर्मिती झाली होती.
त्यामध्ये वाढ करत आणखी एक उपायुक्तपद मंजूर करुन घेतले आहे. त्यानुसार राज्यसेवेतील चार आणि पालिका सेवेतील चार असे आठ उपायुक्त असणार आहेत.
तर, 11 सहाय्यक आयुक्तापैकी एक पद कमी केले आहे. दहा पदे ठेवली आहे. त्यात राज्य सेवेतील पाच आणि पालिका सेवेतील पाच सहाय्यक आयुक्त असा कोटा निश्चित केला आहे.
महापालिकेत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे, अजय चारठणकर पालिकेत उपायुक्त म्हणून यापूर्वीच रुजू झाले आहेत. पालिकेत 12 एप्रिल 2018 पासून प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असलेले ‘सीओ’ केडरचे मंगेश चितळे, 6 जानेवारी 2018 पासून सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या स्मिता झगडे यांना उपायुक्तपदी बढती मिळाली आहे.
या दोघांना उपायुक्तपदावर ‘अॅडजेस्ट’ करुन घेण्याची शिफारस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. त्यावर 12 ऑक्टोबर 2020 रोजी नगरविकास खात्याने मोहर उमठविली आहे.
चितळे, झगडे यांची उपायुक्तपदी नियुक्ती करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे दोघे उपायुक्त म्हणून आणखी तीन वर्ष पालिकेतच राहण्याची शक्यता आहे.
पालिका सेवेतील सुरक्षा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशासन विभागाचे मनोज लोणकर आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत यांना उपायुक्तपदी बढती दिली आहे.
सहाय्यक आयुक्तपदावरील सेवाज्येष्ठता क्रमानुसार उपायुक्तपदावरील या सर्वांची सेवाज्येष्ठता राहणार आहे. उपायुक्तपदी झालेल्या बढत्यांची महापालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये, आस्थापना सूचीमध्ये तसेच इतर अभिलेखांमध्ये संबंधित विभागप्रमुखांनी नोंद घ्यावी. सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.
सहा सहाय्यक आयुक्तपदे रिक्त!
राज्य सेवेतील सुनील आलमलेकर, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी आणि पालिका सेवेतील अण्णा बोदडे असे चार सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत. राज्य सेवेतील सहा आणि पालिका सेवेतील पाच असा 11 सहाय्यक आयुक्तांचा कोटा यापूर्वी होता. त्यामध्ये बदल केला आहे.
एक सहाय्यक आयुक्तपद कमी करुन उपायुक्तपद वाढविले आहे. पाच पालिका आणि पाच राज्य सेवेतील सहाय्यक आयुक्त असा कोटा निश्चित केला आहे. त्यामुळे राज्य सेवेतील दोन आणि पालिका सेवेतील चार अशी सहा सहाय्यक आयुक्तपदे रिक्त आहेत