पिंपरीतील एचए मैदानात बलात्कार करून खून झालेल्या त्या चिमुरडीला न्याय कधी मिळणार?

पिंपरी (वास्तव संघर्ष) उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत . या घटनेमुळे पिंपरी – चिंचवड शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्याही आठवणी जाग्या झाल्या आहेत . पिंपरी-चिंचवड शहरातील एका झोपडपट्टीतील घराच्या शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने सात वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करून मृतदेह झुडपात फेकून दिला होता .ही घटना पिंपरीतील एचए मैदानातील झुडपात २७ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

या धक्क्यातून पिडीत मुलीच्या आई – वडीलांचेही निधन झाले . या घटनेला आज दोन वर्षे उलटून गेली आहेत . तो नराधम परराज्यातील असून परराज्यातच लपून बसलेला आहे असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते दिपक कांबळे यांनी व्यक्त केला आहे. हा नराधम अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नातेवाईक आणि सामाजिक संघटनांकडून कांबळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपरीत एका सात वर्षांच्या चिमुरडीचा छिन्न च्छन्न अवस्थेत पडलेला मृतदेह पाहून त्यावेळी शहरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाशेजारी वापरलेले निरोध मिळून आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले . तपासामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले . दरम्यानच्या काळात पीडित चिमुरडीचे आई आणि वडील यांचे निधन झाले . त्यामुळे चिमुरडीपेक्षा मोठी असणारी दोन भावंडे उघड्यावर आली आहेत . सध्या ती दोन्ही भावंडे मामाकडे राहत आहेत . आरोपी मिळत नसल्याने नातेवाईकांचा संयम सुटू लागला आहे

या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी व्हावी आणि नराधम आरोपीला अटक करून फाशी देण्याची मागणी पहिल्या दिवसापासून करणारे सामाजिक कार्यकर्ते दिपक कांबळे वास्तव संघर्षशी बोलताना म्हणाले की, पिडीत मुलगी ही गरिब कुटुंबातील असल्याने तपास प्रामाणिकपणे होताना दिसत नाही. या प्रकरणी पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला आहे . बालहक्क संरक्षण आयोगानेदेखील पोलिसांना नोटीस बजावली आहे . तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने आरोपी पळून गेला आहे .

अशा वरिष्ठ निरीक्षकावरच कारवाई करण्याऐवजी सध्याचे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मोहीम हाती घेतली आहे. मात्र त्याच्या या निर्णयामुळे शंका व्यक्त होत आहे.

Share this: