पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा
पिंपरी(वास्तव संघर्ष ) – राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतभेद होत असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हा वाद चर्चेत आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांनी पदाचा राजीमाना दिला आहे.
याबाबत सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले, मी गेली २४ वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम करतो आहे. एनएसयूआय चा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून सात वर्षे गाजवली. सोनिया गांधी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ जिल्हाध्यक्ष म्हणून गौरविण्यात आले होते. पुढे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजीव सातव हे असताना मी उपाध्यक्ष होतो. माझे काम पाहून थेट प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली सात वर्षे तिथेही काम केले. नंतरच्या काळात पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचे काम सुरू ठेवले, वाढवले. राष्ट्रवादीचे मातब्बर या शहरात आहेत. भाजपचे आमदार आणि महापालिकेत सत्ता आहे.
शिवसेनेचे खासदार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. कुठलेही हत्यार नसताना लढत राहिलो, पण आता थकलो. विधान परिषदेसाठी मी इच्छुक होतो, त्यासाठई रितसर अर्जसुध्दा दिला होता. वरिष्ठांनी विचार केला पाहिजे होता, ते झालेले दिसत नाही. त्यातच आता वैयक्तीक कारणामुळे मला जबाबदारी सांभाळणे शक्य होत नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार कुठेही जाणार नाही, असेही साठे यांनी स्पष्ट केले