धक्कादायक :पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबत तीन नराधमांनी अपहरण करून केला बलात्कार
पुणे (वास्तव संघर्ष ) :पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पोलीस कर्मचाऱ्याच्या पिडीत मुलीचे अपहरण २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून करण्यात आले होते . अपहरण केल्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला.
याबाबत पिडीत तरुणीनीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी सागर दोन साथीदारांसह गाडीतून तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. गाडीत बसली नाहीस, तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, असं म्हणाला.
त्यानंतर त्याने विषारी द्रव्याची बाटली तरुणीला दाखवली. त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व हातपाय बांधून अहमदनगर येथील नेवासा परिसरात घेऊन गेले. तिथेच तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा पुण्यामध्ये आणून सोडले. तरुणीने त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.