मंडईमधील भाजीपाला, व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार- बाळासाहेब आंबेडकर
पुणे(वास्तव संघर्ष) – भाजीपाला ,फळ ,पान, तरकारी,पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यांना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे त्यांना आपण न्याय मिळवून देणार असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडई येथील विक्रेत्यांना आश्वासन दिले .
मंडई येथील व्यावसायीकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने आज बाळासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई येथे भेट देऊन या व्यावसायीकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ,मी मेट्रो चा आराखडा पाहिला असून त्यानुसार कार्यवाही करावी , येथील व्यापाऱ्यांना जागा द्यायला तयार आहेत परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे आणि ती बरोबर आहे .मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.असा विश्वास त्यांनी येथील स्थानिक व्यावसायिकांना दिला.
यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे ,भाडेवाढ रद्द करावी ,गाळे दुरुस्ती करावी,रोज स्वछता व साफसफाई करावी ,करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सांगितल्या .