बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

सुभेदार रामजी आंबेडकर कमानीचे रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी (वास्तव संघर्ष) : –  ‘पावन झाले आहे पिंपरी चिंचवडचे खोरे, कारण महापौर आहेत माई ढोरे’ अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरवात करूनमिलिंदनगर येथीलसुभेदार रामजी आंबेडकर कमान ही  शांतता, अहिंसा आणि समतेचं प्रतिक आहे तसेच ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची, समतेची कमान असून ती समाज जोडण्याचे  प्रतिक ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्र.21  मिलिंदनगरमधील सुभेदार रामजी आंबेडकर या भव्य कमानीचा लोकार्पण सोहळा रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य संदिप वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,   सुधाकर वारभुवन, रमेश चिमूरकर, सुरेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, ख्वाजाभाई शेख, स्वप्नील कांबळे, कुणाल व्हावळकर, भारत बनसोडे, मोनिका निकाळजे,  दिपक मेवाणी  आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.    

रामदास आठवले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेतील विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.अखेरपर्यंत समाजाला जोडण्यासाठी ते कार्य करत राहिले.आज समाज एकत्र येताना दिसतोय, ही समाधानाची बाब आहे. मिलिंदनगर येथील भव्य कमानही याच विचारांचे प्रतिक आहे. पिंपरी चिंचवडची  विकासकामे  इतर महापालिकेंच्या तुलनेने अग्रेसर आहेत. सर्वसामान्य माणसांचा विकास झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे.  त्यामुळे सर्वाना शौचालयासह पक्की घरे मिळाली पाहिजेत.  पिंपरी चिंचवड मधील नागरिक विचारांनी श्रीमंत आहेत असे सांगून त्यांनी सर्वांनी सक्षम व्हावे, शिक्षणाचा मार्ग स्विकारून  आपली प्रगती करावी यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, डॉ. महामानव बाबासाहेबांच्या वसाहतीसाठी कमान उभी करणे ही संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. हा कार्यक्रम महापालिका आधीच घेणार होती तथापि  कोरोनामुळे दोन वर्षे कार्यक्रम घेता आले नाही, एकत्र येता आले नाही असे सांगून त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वागत करताना आपण या कार्यक्रमासाठी आलात आणि या कमानीचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले. आपल्या रूपाने एक उर्जा या शहराला मिळाली असल्याचे महापौर माई ढोरे म्हणाल्या.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाची जागा देण्याची घोषणा महानगरपालिकेने केली असून स्मारकाची उभारणी लवकरच होणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहा हजार पाचशे घरे  येत्या वर्षभरात उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कमानीबाबत समाधान व्यक्त केले आणि महापौरांचे आभार मानले. नगरसदस्य संदिप वाघेरे यांनी गेले अनेक वर्षापासूनची जनतेची या वसाहतीतील कमानीसाठी  मागणी होती ती आज पूर्ण झाली असून आज भव्य कमान याठिकाणी उभी राहिली आहे याचे समाधान असल्याचे सांगितले.  

Share this: