विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने हिंजवडी पोलिसांनी मुळ मालकांना केली परत
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्याचे काम हिंजवडी पोलीस एका संस्थेच्या माध्यमातून करीत आहेत . मागील तीन दिवसात 175 मालकांचा शोध लागला आहे . वेगवेगळ्या गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलीस जप्त करतात . तसेच अपघातग्रस्त वाहने , अन्य कारवाई केलेली वाहने पोलीस ठाण्यात आणून लावली जातात . त्यांच्यावर कारवाई केली जाते . त्यानंतर ती वाहने अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या आवारातच पडलेली आढळून येतात . पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात शेकडो वाहने धूळ खात पडलेली आहेत . अनेक वर्षांपासून त्या वाहनांच्या शोधात पोलीस ठाण्यात कुणीही फिरकले नाही . त्यामुळे वाहनांचे काही पार्ट कुजले आहेत . हिंजवडी पोलीस ठाण्यात 400 पेक्षा अधिक वाहने पडलेली आहेत .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी परंदवडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या साहाय्याने एक मोहीम हाती घेतली आहे . तीन दिवसात 175 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लावण्यात पोलीस आणि संस्थेच्या संयुक्त पथकाला यश आले आहे . वाहन मालकाचे नाव , वाहनाचा नोंदणी क्रमांक , वाहनाचा प्रकार , चासी क्रमांक , इंजिन क्रमांक , मालकाचा पत्ता या माहितीची यादी हिंजवडी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे . वाहन मालकांनी आपापली वाहने ओळख पटवून घेणून जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे . हिंजवडी पोलीस ठाण्यात पडलेल्या वाहनांपैकी मालकांचा शोध लागलेली वाहने महाराष्ट्र राज्यातील पुणे , पिंपरी – चिंचवड , सोलापूर , नाशिक , मुंबई , नागपूर , रायगड , सातारा , लातूर , रत्नागिरी , कोल्हापूर , नंदुरबार या भागातील आहेत .
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर हुबळी , भोपाळ , ऑरा बुरुज गुजरात , भुवनेश्वर येथील देखील काही वाहने आहेत . पोलिसांकडून वाहन मालकांशी संपर्क केला जाणार आहे . त्यानंतर 15 दिवसात वाहन न नेल्यास त्या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार आहे.