पिंपरी चिंचवडमध्ये आरटीओचे बोगस सर्टिफिकेट बनवणारी टोळी पोलीसांनी केली गजाआड
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी चिंचवड शहरात आरटीओचे बोगस सर्टिफिकेट बनवणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. काळेवाडी येथील ‘ आशीर्वाद कॅफे वर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून या टोळीला अटक केली आहे . या टोळीने आतापर्यंत आठशे लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली . यामध्ये आरटीओ फिटनेस , टॅक्स पावती , वाहन इन्शुरन्स , पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्राचा समावेश आहे.
राहुल गौड ( वय 33 , रा.रुपीनगर , निगडी ) , बालाजी गोरख बाबर ( वय 23 , रा.संदीपनगर , थेरगांव ) , तुकाराम अर्जुन मगर ( वय 30 , रा . गजानन नगर , काळेवाडी फाटा ) , प्रवीण दशरथ दळवे ( वय 25 , रा . राशे फाटा , चाकण ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने काळेवाडीतील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे . आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड हा त्याच्या इतर पाच साथीदारांसह बनावट कागद पत्र तयार करत होता . यात , आरटीओ फिटनेस , टॅक्स पावती , वाहन इन्शुरन्स , पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे संगणकावर बनवली जात होती . आरोपी राहुल ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत त्यांच्याशी संपर्क करुन व्हाट्सऍपवर नाव आणि पत्ता घ्यायचा , त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिली जायची . याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत . आरोपींकडून 1 लाख 21 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल , बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य , प्रिंटर , पेन ड्राइव्ह , झेरॉक्स मशीन यासह काही सर्टिफिकेट , एक मोबाईल आणि रबरी स्टॅम्प असं साहित्य जप्त करण्यात आले आहे .ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली .