मास्टर चावीचा वापर करून चोरल्या 35 दुचाकी;दोन आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :मास्टर चावीचा वापर करून चोरट्यांनी तब्बल 35 दुचाकी चोरल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे उघडकीस आली आहे .पुणे , लातूर , जालना , धुळे , अहमदनगर या जिल्ह्यातून या दुचाकी चोरून त्या दुचाकी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने किरकोळ किमतीत विकल्या जात होत्या . पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने या टोळीला बेड्या ठोकल्या असून 33 लाख रुपये किमतीच्या 35 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
संकेत आनंदा धुमाळ ( वय 22 , रा . मु.पो.खडकवाडी , ता . आंबेगाव , जि . पुणे ) , श्रीकांत बाबाजी पटाडे ( वय 23 , रा . मु.पो. बोरी बुद्रुक , ता . जुन्नर , जि . पुणे ) , सुनिल आबाजी सुक्रे ( वय 26 , रा.खडकवाडी , ता.आंबेगाव , जि . पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पञकार परिषदेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहीती दिली यावेळी ते म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की , वखार महामंडळ चौक , पुणे नाशिक हायवे , भोसरी येथे दोघेजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार आहेत . त्यानुसार एका पथकाने परिसरात सापळा लावला . मात्र चोरटे ठरलेल्या ठिकाणी तेथे आले नाही . त्यातील एकजण आंबेगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी काढली आणि दरोडा विरोधी पथकाची एक टीम थेट आंबेगावला रवाना झाली . तिथे पोलिसांनी संकेत धुमाळ याला अटक करण्यात आली . धुमाळकडे चौकशी करून त्याचा दुसरा साथीदार श्रीकांत पटाडे याला ताब्यात घेतले . दोघांकडे तपास करून पोलिसांनी सुनील सुक्रे याला देखील अटक केली .
आरोपी संकेत धुमाळ याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने पुढे अॅटोमोबाईलचे प्रशिक्षण पूर्ण केले. तो पी.जी. कंपनीमध्ये सुपा येथे काम करीत आहे . श्रीकांत पटाडे विवाहीत असून त्याचे अकरावी पर्यंत शिक्षण झाले आहे . तो ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय करतो . तसेच आरोपी सुनिल सुक्रे आय.आय. बी . एम . चिखली या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत होता . तसेच तो भारती विद्यापीठ कात्रज येथे गेस्ट सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणासाठी असताना , त्या परिसरातील 10 दुचाकी वाहने चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . आरोपी सुनील हा मोटार सायकल चोरी करताना मास्टर चावीचा वापर करीत असे . वाहने चोरून ती यातील आरोपी श्रीकांत याच्या मार्फतीने गिऱ्हाईक शोधून त्यांना 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत विकत असे . गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून काही वाहनांवर स्वतःच्या गाडीची नंबर प्लेट टाकून , पैशांची अडचण असल्याचे कारण सांगून वाहने गहाण ठेवीत असे . मिळालेले पैसे आरोपी तिघांमध्ये वाटून मौजमजा करीत होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे 2 ) श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे , राजेंद्र शिंदे , राहुल खारगे , विक्रांत गायकवाड , नितीन लोखंडे , आशिष बनकर , प्रविण कांबळे , सागर शेडगे , प्रविण माने , राजेश कौशल्ये , गणेश कोकणे , औदुंबर रोंगे , गोविंद सुपे यांच्या पथकाने केली आहे .