बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांचे पाच हजार रुपये परत करा

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन 2020 मध्ये  पिंपरी-चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात आलेले आहे. सदर योजना राबवित असताना अर्जदारांकडून अर्ज करतेवेळी डिमांड ड्राफ्ट मार्फत अनामत रक्कम रुपये ५०००असे स्वीकारण्यात आले. सदरची रक्कम ही अपात्र  अर्जदारांना सोडत झाल्यानंतर १५ दिवसाच्या आत देण्याची योजनेत अट होती. सदरची सोडत होऊन एक महिन्याचा कालावधी झालेला असून देखील, अपात्र ठरलेल्या नागरिकांना त्यांचे अनामत रक्कम रुपये पाच हजार देण्यात आलेले नाही. ही अनामत रक्कम परत करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी पिं. चिं. शहर मा.युवक अध्यक्ष  गुलाब पानपाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पानपाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरांमध्ये covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून राज्य प्रशासनाकडून कडक निर्बंध लादून लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांपासून ते व्यापारी उद्योजकांपर्यंत आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजना ही मुळातच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व बेघर असणाऱ्या नागरिकांसाठी होती.  यातील बरेचसे नागरिक हे झोपडपट्टीतील मजूर असून त्यांचे लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.

तसेच कोणतेच शासन व प्रशासन या नागरिकांना कोणतेही आर्थिक मदत करत नसल्याने त्यांना हातभार म्हणून या योजनांमध्ये केलेली हक्काची अनामत  रक्कम त्यांना परत मिळणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. तरी प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र नागरिकांनी भरलेली अनामत रक्कम त्यांना त्वरित देण्यात यावी.सदर योजनेतील अपात्र नागरिकांनी सदरची रक्कम न मिळाल्याने आत्महत्या केल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.असेहीी सदरील निवेदनात गुलाब पानपाटील यांनी म्हटले आहे

Share this: