हल्यात जखमी झालेला मोहननगर येथील कुख्यात गुंडाचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी (वास्तव संघर्ष) चिंचवड मोहननगर येथील कुख्यात गुंडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 10 एप्रिल(शनिवार) रोजी या गुंडावर काही टोळक्यानी खूनी हल्ला केला होता .आज रविवारी ( दि . 25 ) रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे .
आकाश शिवाजी सरगर ( वय 27 , रा . दातेरी चाळ , मोहननगर , चिंचवड ) असे खून झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे .
शुभम गणेश राठोड ( वय 20 ) , मयुर बाळासाहेब पानसरे ( वय 22 , दोघेही रा . मोई , ता . खेड , जि . पुणे ) आणि शिवाजी माधव काळे ( वय 22 , रा . चिखली ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . तर एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत आकाश सरगर याच्यावर दोन विनयभंगाचे गुन्हे , हाताने मारहाण , जबरी चोरी , शस्त्राने मारहाण करणे , असे गुन्हे दाखल आहेत . त्याला 2017 मध्ये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते . सरगर याच्यावर 10 एप्रिल रोजी मोहननगर , चिंचवड येथे खूनी हल्ला झाला होता . तेव्हापासून त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . मात्र रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . सरगर याच्यावर हल्ला करण्यात आणखी काहीजण असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा .
अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही , अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली . यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला . मात्र पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अंत्यविधी करण्याची तयारी दर्शविली . यापूर्वी दाखल झालेल्या खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली असून आता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.