पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ते 16 नगरसेवक ॲन्टी करप्शनच्या रडारवर
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड चिंचवड महानगरपालिकेत लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समिती अध्यक्ष ऍड . नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला . यामुळे त्यांचा जेलमधील मुक्कामात आता वाढ होणार आहे . जाहिरातीचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडून एक लाख 18 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते . या प्रकरणी पाचही जणांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती . सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान स्थायी समितीमधील कर्मचारी ज्ञानेश्वर पिंगळे , अरविंद कांबळे , राजेंद्र शिंदे व विजय चावरिया यांना न्यायालयाने येरवडा कारागृहात पाठवले होते . मात्र आपले नातेवाईक मयत झाल्याचे कारण दिल्याने न्यायालयाने ऍड . नितीन लांडगे यांना तात्पुरता 26 ऑगस्टपर्यंत जामीन दिला होता .
या जामीनाची मुदत संपुष्टात आल्याने गुरुवारी अॅड . नितीन लांडगे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले . यावेळी लांडगे यांच्या वकीलाने जामीनासाठी अर्ज केला . मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . त्यामुळे तात्पुरत्या जामीनावर बाहेर आलेल्या लांडगे यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत काही दिवस काढावे लागणार आहेत .
लाचेच्या मागणीची पडताळणी करताना 16 जणांचा उल्लेख रेकॉर्डवर आला आहे . ते 16 जण म्हणजे स्थायी समितीचे 16 सदस्य तथा नगरसेवक आहेत . त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे . तसेच अटक केलेल्या पाच आरोपी यांच्यात काही रॅकेट आहे का , याबाबतही तपास करण्यात येणार असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज पुन्हा न्यायालयास सांगितले .
23 ऑगस्ट रोजी नितीन लांडगे यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती . त्यावेळी तात्पुरता जामीन मिळावा , यासाठी .नितीन लांडगे यांनी आपल्या आईची आई ( आजी ) ताराबाई बाबूराव बो – हाडे या मयत झाल्याचे कारण दिले होते . मात्र ताराबाई या ऍड . नितीन लांडगे यांच्या आईच्या आई नसून , त्या वडिलांच्या मावशी आहेत . त्यामुळे लांडगे यांनी न्यायालयात खोटी माहिती दिल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले . खोटी माहिती दिल्याच्या कारणावरूनच त्यांना जामीन अर्ज आज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे .