गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांचा नदीत बुडून मृत्यू ;एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश
भोसरी (वास्तव संघर्ष) : हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती ,डुडळगाव येथील ठोंंबरे कुटुंबातील नागरिक गणपती विसर्जनाच्या वेळी इंद्रायणी गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यातील दोघे जण नदीत बुडाले . त्यापैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले . बुडालेल्या दुसऱ्या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरू आहे . ही घटना ( रविवारी ) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली .
प्रज्वल रघुनाथ काळे ( वय 18 ) व दत्ता आबासाहेब ठोंबरे ( वय 20 ) अशी या दुर्घटनेत नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत . त्यापैकी प्रज्वल काळे याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली . डुडुळगावच्या माऊली वस्ती येथील ठोंबरे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी आले होते . त्यांच्या पैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे ( वय 30 ) नितीन अर्जुन ठोंबरे ( वय 39 ) , दत्ता आबासाहेब ठोंबरे ( वय 20 ) आणि प्रज्वल रघुनाथ काळे ( वय 18 ) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले . नदी पात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले . बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते . ते मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते आत पाण्यात गेले होते . भोसरी एमआयडीसी पोलीस , आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली . त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून दत्ता ठोंबरे याचा शोध घेणे चालू आहे . एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत .