पाच तोळ्याचे सोन्याचे मणी देते, असे म्हणून वृध्द महिलेची केली 50 हजार रुपयांची फसवणूक
चिंचवड (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील एका वृद्ध महिलेला पाच तोळ्याचे सोन्याचे मणी देते , असे सांगून दोन चोरट्या महिलांनी 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे . ही घटना चिंचवड येथे गुरुवारी ( दि . 23 ) दुपारी घडली .
पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी वृद्ध महिला या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम जवळ , चिंचवडगाव येथून पायी चालल्या होत्या . त्यावेळी दोन अनोळखी महिलांनी त्यांना आवाज देऊन थांबविले . एका महिलेने सोबतच्या दुसऱ्या महिलेकडे हात दाखवून ‘ हिच्याकडे खूप जास्त सोन्याचे मणी आहेत . हिला सोलापूरला जायचे आहे , तिच्याकडे पैसे नाहीत , ‘ असे म्हणून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला . त्या दोन चोरट्या अज्ञात महिलांनी फिर्यादी यांना पाच तोळे सोन्याचे मणी देतो , असे सांगून बाजूला नेले .
महिलेकडून 20 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे भरवी मनी व दोन वाट्या असलेले मंगळसूत्र तसेच 10 हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे सोन्याचे दागिने घेतले . शिवाय रोख 19 हजार 500 रुपये असे एकूण 49 हजार 500 रुपयांची फसवणूक त्या महिलांनी केली . परंतु , पाच तोळे सोन्याचे मणी मात्र दिले नाहीत.याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करीत आहेत .