हेल्मेट न देणाऱ्या वाहन वितरकांवर कारवाई करा – अपना वतन संघटनेची मागणी
पिंपरी(वास्तव संघर्ष): ग्राहकाने दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांना हेल्मेट न देणाऱ्या शहरातील वाहन वितरकांवर कडक कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनाचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ,पिंपरी चिचंवड , पोलीस आयुक्त , पिंपरी चिचंवड यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, नागरिक आपल्या दैनंदिन प्रवासासाठी शासनाचे आवश्यक ते सर्व कर भरून दुचाकी खरेदी करतात .चालू वर्षात पिंपरी चिचंवड शहरात मोठ्या प्रमाणावर सर्वच कंपन्यांच्या दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम नुसार वाहन वितरकांनी ग्राहकाला गाडी विकताना हेल्मेट देणे बंधनकारक आहे.परंतु शहरामध्ये अनेक वितरक ग्राहकांनी हेल्मेटची मागणी केली असता हेल्मेट देत नाहीत. ग्राहकाकडून रक्कम घेतली जाते आणि गाडीची नोंदणी केली जाते परंतु नियमाप्रमाणे हेल्मेट दिले जात नाही. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी दुचाकीची विक्री करतानाच खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसून, नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांना हेल्मेट न देता दुचाकी वाहन वितरक ग्राहकांचा विश्वासघात व फसवणूक करीत आहेत. याबाबत अपना वतन संघटनेकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत त्यानुसार संघटनेने केलेल्या पाहणीनुसार वाहन वितरकांनी शहरातील बऱ्याच जणांना हेल्मेट दिले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 नियम 138 (4) फ तसेच मा. मुंबई उच न्यायालय औरंगाबाद खंडपीठ क्रिमिनल सुमोटो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 2 /2021 मधील निर्देशानुसार , तसेच जनहितयाचिका क्रमांक 9/2019 मुंबई उच न्यायलायच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार कंपनीने व वितरकाने गाडी विकतानाच अनेक ग्राहकांना 2 हेल्मेट दिलेलेच नाहीत. त्यामुळे पिंपरी चिचंवड मधील सर्व वाहन वितरकांची याबाबात चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.