बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

अध्यादेश जारी…! ‘एक वार्ड तीन नगरसेवक’ या पध्दतीनेच होणार महापालिका निवडणुक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : एक वार्ड तीन नगरसेवक असा मिळून त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते. पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचे असते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी यातून प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच महापालिका निवडणुकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनाच अंतिम राहणार यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “जेव्हा तीन पक्षांचे आघाडी सरकार चालवत असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचे असते. त्यात पुन्हा एकदा वेगळे वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरावयाचे नसतात, असे माझे वैयक्तिक मत आहे. निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. परंतु निर्णय घेतला की त्या निर्णयाचे आम्ही समर्थनच करत असतो. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकास आघाडी सरकारचा निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी आता राज्यात होईल.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. विधीमंडळात काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात नेते आहेत. कॅबिनेटला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर मान्यवर देखील होते. आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि इतरजण होते. त्यामुळे याबाबत लगेच काही आकाशपाताळ कोसळले आहे, असे समजण्याचे कारण नाही.प्रभाग रचनेतील मतमतांतरांबाबतही अजित पवार यांनी आपले निरीक्षण मांडलं. ते म्हणाले, विचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काही शहरांची परिस्थिती कुठल्या पक्षांना अनुकुल असते, तेथे त्यांनी चार किंवा तीन प्रभाग असावे, असे वाटते. जिथे परिस्थिती अनुकुल नसते, तिथे दोन किंवा एक प्रभाग असावा असे वाटते. त्यानुसार मते व्यक्त केली जातात. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्यांनी घेतलेला निर्णय सर्वजण मान्य करतात.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे . कारण , तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे . हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे . आता राज्यपाल कोश्यारी या अध्यादेशावर स्वाक्षरी करणार का , याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे .

Share this: