भाईला उधारीवर कपडे दिले नाही म्हणून दुकानात केला राडा
चिंचवड (वास्तव संघर्ष) : भाईंना उधारीवर नवीन कपडे दिले नाही म्हणून दुकानात जाऊन मारहाण करून जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना गुरुवारी(दि.4) सायंकाळी सातच्या सुमारास वर्षा हर्षा कलेक्शन दगडोबा चौक चिंचवडे नगर चिंचवड येथे घडली आहे.
गणेश राजु बजलर यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हुसेन रमजान बागवान (वय-25, रा . वेताळनगर चिंचवड) सोन्या जब्बार नदाफ (वय-22 वेताळनगर चिंचवड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे कपडयाचे दुकानात असताना आरोपींनी दुकानामध्ये घुसुन त्यांचेकडे उधारीवर कपडे मागुन , आम्ही इथले भाई आहोत तुला माहिती नाही का ? असे म्हणुन उधारीवर कपडे देण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींना नकार दिल्याने फिर्यादी यांना मारहाण केली व दुकानाच्या गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने घेवुन जाण्याचा प्रयत्न केला . तेव्हा फिर्यादी यांनी आरोपींना अडविले असता त्यांनी फिर्यादीस आणि दुकानाचे मालक रवि कांबळे , लिंगाप्पा कांबळे , आदेश लुंकड यांना उसाचे दांडक्याने दगडाने मारहाण केली . त्यामध्ये रवि कांबळे यांच्या डाव्या हाताला , दोन्ही पायांना जखम झाली असुन लिंगाप्पा कांबळे यांचे देखील हातावर जखम झालेली आहे तसेच आरोपींनी दुकानाच्या दरवाज्याजवळील काच फोडुन व कॅश कांऊटरचे टेबल जमीनीवर पाडुन त्याचे नुकसान केले आहे . तसेच फिर्यादीला शिवीगाळ करुन , जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीना चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वारे करित आहेत.