बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :  आजची महिलादेशाच्या राष्ट्रपतीपदी, पंतप्रधानपदी आणि अन्य महत्वाच्या पदी पोहोचली याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आणि पिंपरी चौक येथील त्यांचे स्मारक तसेच मोशी महानगरपालिका शाळेमधील त्यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, संगिता सस्ते, नगरसदस्य संतोष लोंढे, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मोशी महानगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्रार, मुख्याध्यापिका अलका डुंबरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, संतोष शिंदे, संतोष जोगदंड, शंकर लोंढे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सामाजिक कार्यकर्त्या  रोहिणी रासकर, कविता खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, आज भारतीय महिला देशातील तसेच विदेशातील अनेक उच्च पदे महिला समर्थपणे भुषवित आहेत.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील महिला सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करताना दिसत आहेत.  महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी महिला शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्या म्हणाल्या.  महिला शिक्षण दिनानिमित्त त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. 

महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.  महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनावर आधारीत रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांनी केले.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ऑनलाईन विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटनही महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.  त्यास ऑनलाईन प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  त्यामध्ये आदर्श माता म्हणून नुकताच गौरव झालेल्या शहर सुधारणा समितीच्या सभापती अनुराधा गोरखे, अंगणवाडी शिक्षिका पूनम कोलते सोनवणे, असंघटित कामगार घरेलू या संघटनेच्या मीनाताई मोहिते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. मनिषा महाजन, कौटुंबिक वाद निर्मूलन समितीच्या अॅड. प्रीती वाघ कांबळे,  शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल रुहीनाज शेख यांचा तर आपुलकी जेष्ठ नागरीक संघाच्या फैमिनाज जावेद शेख यांचा तर श्रीमुक्ती चळवळीच्या शारदाताई मुंढे यांचा सन्मान करण्यात आला.  व्यावसायिक महिला संघटनेच्या तृप्ती धनवटे यांचा तर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्ल अरुणा पाटील आणि जागृती सातपुते यांना सन्मानित करण्यात आले.

कोरोना काळात उत्कृष्ठ काम करणा-या डॉ. दिपाली अंबिके, बालरोगतज्ञ यांचा तर पत्रकार अमृता ओंबाळे यांचा सन्मान करण्यात आला.  यानंतर संघर्षा उषा कांबळे यांनी ‘ व्हयं, मी सावित्री फुले बोलतेयं ’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला तर सुप्रसिध्द शाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी शाहीरी जलसा सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड आणि प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share this: