विषय संपला..! महानगरपालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होणार
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्रातील मुंबई आणि औरंगाबाद महापालिका वगळता इतर 18 महापालिकांची निवडणूक आगामी वर्षातील मार्च महिन्यात होतील. त्यासाठीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाने संबंधित महापालिकांना 7 जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार, आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे आता निवडणूक कधी होणार? कधी होणार हा विषय संपला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार असून महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाच दिवशी जाहीर केली जाईल . मात्र ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण सोडत त्याच दिवशी जाहीर केली जाईल. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रारूप आराखडा प्रसिध्द होणार आहे.
निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे हे 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्याचे ठरले आहे तसेच प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी 1 ते 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत करायचे आहे आणि प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास 16 फेब्रुवारी 2022 ला सादर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी असेल सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक 2 मार्च 2022 असा आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम राहणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महानगपालिकेला पाठविला आहे.
दरम्यान,अनुसूचित जाती( एससी ) साठी 22 जागा राखीव असतील. त्यात 11 महिला आणि 11 पुरुषांसाठी जागा असणार आहेत. 2 महिला आणि 1 पुरुषाकरिता अशा 3 जागा अनुसूचित जमाती ( एसटी ) साठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण 46 प्रभाग असणार आहेत. त्यात 3 सदस्यांचे 45 आणि 4 सदस्यांचा 1 प्रभाग असणार आहे.