पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘त्या’ भाईंचे मुंडन करुन शहरात काढली धींड
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एका तडीपार आरोपीने फोनवर भाई म्हटलं नाही म्हणून तरूणाला बेदम मारहाण करत जमिनीवर बिस्किट टाकून कुत्र्यासारखी बिस्किट खायला लावली होती. विशेष म्हणजे आरोपींनी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत . तसेच त्या भाईंना अद्दल घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुंडांचं मुंडन करुन शहरात धींड काढली आहे .
याबाबत पिडीत 20 वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती .
त्यानुसार प्रशांत आठवले (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रकाश इंगवले (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) या आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
“मला भाई का बोलला नाही? मी कुणाला सोडणार नाही म्हणत कमरेच्या पट्ट्याने पीडित तरुणाला मारहाण करण्यात आली होती तसेच त्याला कुञ्यांसारखी वागणूक देत आरोपींनी जमिनीवरील बिस्किटे खाण्यास भाग पाडले होते ही घटना 25 जानेवारीला घडली होती. त्यानंतर आरोपींनी स्वत: व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आपल्याला भाई बोलला नाही म्हणून आपण अशाप्रकारे मारहाण केली, अशा आशयाचा व्हिडीओ शेअर करत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या मुजोरांची दहशत आणि माज नाहीसा करण्यासाठी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण अल्पवयीन आहेत. तर दोन आरोपी हे सुजाण होते. तरीही त्यांनी अशाप्रकारे कृत्य केल्याने पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींचे मुंडन करुन शहरात धिंड काढली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.