राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी अजीत गव्हाणे यांची निवड
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या . सध्याचे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आणि महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांचा पक्षाने राजीनामा देखील घेतला आहे. त्यानुसार नव्याने पदाधिकारी निवड होणार होती. शहराध्यक्ष पदी प्रत्येक जण आपली वर्णी लागावी म्हणून कंबर कसून होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहरातील राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्या देखील वाढल्या होत्या.
त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी देत शहराध्यक्षपदी माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान युवा नगरसेवक अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष पदासाठी कविता अल्लाट व युवक अध्यक्षपदासाठी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.शहराला एक शहराध्यक्षासोबत तिन्ही विधानसभेसाठी स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून भोसरी विधानसभेसाठी राहुल भोसले पिंपरी विधानसभेसाठी जगदीश शेट्टी व चिंचवड विधानसभेसाठी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन युवकांची ‘युवा टीम’ महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील आढावा बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्याने अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर लावण्यासाठी राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक युवक नेतृत्व यांनी पक्षाला भरघोस यश मिळवून दिल्याचा आदर्श समोर ठेवून बदल केले असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारणीमध्ये तिन्ही शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष युवा कार्यकर्त्यांना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस 2022 ची सार्वत्रिक निवडणुकीला युवा जोश तयार करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केले आहे.