क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील झाडांची कत्तल करणा-या ‘त्या’ पुष्पावर आयुक्त कारवाई करणार का?

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पुष्पा सिनेमाची कथा रक्तचंदन अर्थात लालचंद झाडांच्या तस्करीवर आधारित आहे. आतापर्यंत हा विषय समोर आला नव्हता. त्यामुळे  ही कथा चित्रपट रसिकांना चांगली आवडली आहे. वास्तविक हा विषय खरा आहे. दक्षिणेतील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी  होत असते. त्यातून अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.माञ असाच एक पुष्पा पिंपरी चिंचवड शहरात देखील निर्माण झाला असून त्याने अनेक प्रजाती असलेल्या झाडांची कत्तल केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणाच्या बाबतीत पिंपरी चिंचवड महापालिका धोरण अतिशय उदासीन दिसते आहे. नद्यांचा प्रश्न असो, सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रश्न असो , किंवा शहरामध्ये उद्यान विभागाच्या संगनमताने होत असलेली अवैध वृक्षतोड असो असे अनेकविध प्रश्न आहेत.

शहरात अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई केली जात नाही. खूपच पाठपुरावा केला तर नावापुरती कारवाई केली जाते. राजकीय पुढारी , वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिशय पद्धतशीरपणे उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत आहेत असं म्हंटल तर वावगं ठरू नये.मागील आठवड्यात आकुर्डीमधील फॉर्मायका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैध वृक्षतोड करण्यात आली . एका पालिका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलेल्या माहितीनुसार , या वृक्षतोडीसाठी पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच बेकायदेशीर ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. शिवाय याठिकाणहून वृक्षतोड करून झाडे वाहतूक करण्यासाठी 10 ते 12 मोठ्या गाड्या व ट्रेलर वापरण्यात आले.

त्या गाड्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे बोर्ड लावण्यात आलेले होते. तसेच सदरची झाडे तोडल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने त्यांची मुळे उखडून टाकून त्याठिकाणी मुरूम भरून पुरावे नष्ठ करण्यात आलेली आहेत. पूर्ण सपाटीकरण करण्यात आले आहे. यावरून पालिकेचा उद्यान विभाग संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे.सदर प्रकरणाची माहिती कळताच अपना वतन संघटनेचे कार्यध्यक्ष हमीद शेख व महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर यांनी बेकायदेशीर अवैध वृक्षतोड बाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , पिंपरी चिचंवड महापालिका आयुक्त राजेश पाटील , अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , मुख्य उद्यान अधीक्षक , वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन यांना सदरप्रकारणी अवैध वृक्षतोड करणाऱ्या , कंपनी मालक , ठेकेदारांवर व त्यांना अभय देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986व वृक्षतोड प्रतिबंधक कायदा , तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 कलम 8(1) प्रमाणे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेने केलेली आहे.

अशाप्रकारे तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा पिंपरी चिचंवड महापालिकेकडून सदर ठिकाणचा पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात आहे . त्यामुळे पालिका आयुक्त राजेश पाटील या प्रकरणात तत्परतेने भूमिका करतील काय ? असा प्रश्न शहरातील पर्यावरणप्रेमी विचारात आहेत.

Share this: