दर महिन्याला हप्ता दे नाहीतर..असे म्हणून डॉक्टरकडे मागितली खंडणी
भोसरी (वास्तव संघर्ष) : दर महिन्याला हप्ता दे नाहीतर तूला या एरियात फिरू देणार नाही अशी धमकी देऊन डॉक्टरकडे खंडणी मागितली आहे. तसेच मेडिकलमधून पैसे न देता औषधे नेली.ही घटना बुधवारी ( दि .5 ) सायंकाळी आनंदनगर चौक , भोसरी येथे घडली आहे.
पुरुषोत्तम राणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुदर्शन उर्फ पिल्या संभाजी राक्षे ( वय 25 ) , गोविंदा कोळी ,सचिन उर्फ काळा सच्या ( वय 23 , सर्व रा . आनंदनगर , भोसरी ) यांच्या आरोपीविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचे आनंदनगर चौकात पुरुषोत्तम क्लिनिक आहे. ते बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता क्लिनिक मध्ये असताना आरोपी क्लिनिकमध्ये आले.तू मला दर महिन्याला सात हजार रुपये हप्ता म्हणून द्यावे लागतील.तरच तू दवाखाना चालवू शकतो.नाहीतर तुला दवाखाना चालवू देणार नाही.इलाक्यात फिरू देणार नाही.दर महिन्याला गोविंदा कोळी आणि काळा सच्या येऊन तुझ्याकडून सात हजार रुपये घेऊन जातील , अशी आरोपींनी फिर्यादींना धमकी दिली. क्लिनिकच्या बाहेर असलेल्या मेडिकल मधून आरोपींनी औषधे घेतली , त्याचे पैसे न देता मेडिकल मालकाला शिवीगाळ करून आरोपी निघून गेले.अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत .