बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड आगामी दोन वर्षांत पाणी पुरवठ्यात ‘आत्मनिर्भर’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी (वास्तव संघर्ष) :वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आम्ही राज्य सरकारकडून पाण्याचे अतिरिक्त आरक्षण दिले. कारण,  पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचरा समस्या निर्मूलन या बाबी शाश्वत विकासासाठी महत्त्वाच्या आहेत.  चिखलीतील 100 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रामुळे शहरातील पाणी पुरवठा सक्षम होईल. मात्र, एकूण 267 एमएलडी पाणी पुरवठ्याबाबत प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. तोपर्यंत वाढत्या नागरिकरणानुसार, सक्षम पाणीस्त्रोत निर्माण होणार नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत प्रस्तावित भूमिसंपादन एक महिन्याच्या आत पूर्ण करावे आणि जागेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरण करावे. आवश्यकता वाटल्यास उच्चस्तरीय बैठक घ्यावी. आगामी दोन वर्षांत पिंपरी-चिंचवडला पिण्याचे मुबलक पाणी मिळाले पाहिजे,  अशा सूचना राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.  

निगडी प्राधिकरण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासकीय भवन, भामा आसखेड प्रकल्पांतर्गत जॅकवेल उभारणी, चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध 22 विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
 
यावेळी पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर माई ढोरे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे,  आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका माया बारणे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे,  जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.  

तत्पर्वी, चिखली येथील 100 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये सर्व प्रकल्प आणि विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी ग. दि. माडगूळकर यांची चौथी पिढी सुमित माडगूळकर आणि परिवाराचा सन्मान करण्यात आला.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहराच्या स्थापनेपासून एकच पवना धरणाचा स्त्रोत होता. त्यानंतर 52 वर्षांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकाळात दुसरा स्त्रोत निर्माण झाला. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पामुळे शहर पाण्याबाबत आत्मनिर्भर होणार आहे. मोशीमध्ये 1972 पासून कचरा टाकला जात होता. त्यामुळे वेस्ट टू एनर्जी सारखा प्रकल्प फडणवीस यांच्याच सत्ताकाळात हाती घेतला. समाविष्ट गावांमध्ये 2017 ते 2023 मध्ये जी विकासकामे झाली, ती गेल्या 20 वर्षांत झाली नव्हती. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस दूरदृष्टीने काम करीत आहे. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाला मंजुरी मी स्थायी समिती सभापती असताना दिली होती. स्थानिक नगरसेवकांनी या कामासाठी पुढाकार घेतला. त्या नाट्यगृहाचे उद्घाटन आज होत आहे, याचे विशेष समाधान वाटते.

Share this: