पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नाही
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर आणि पिंपरी- भोसरी रस्त्यालगत शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाची शहरात चर्चा असताना माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे . पन्नास वर्षे जुन्या या वसाहतीचे 2002 मध्ये सर्वेक्षण झाले होते. मात्र, त्यावेळेपेक्षा आता साधारणतः दुपटीने झोपड्यांमध्ये वाढ झालेली असून, त्यांचे पुनर्सर्वेक्षण होणार आहे अशा प्रकारच्या अफवा गेली काही दिवस याच भागात चालल्या होत्या त्या अनुषंगाने ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे गांधीनगर झोपडपट्टीचे अद्याप तरी पुनर्वसन होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रविण कांबळे यांना उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचा कोणताही पुनर्वसनाचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सद्यस्थितीत दाखल नाही. तसेच या कार्यालमार्फत विषयांकित मिळकतीचे सर्व्हेक्षण करणेचे सद्यस्थितीत नियोजन नाही. संमतीपत्र हे विकसक व झोपडीधारक यांचेतील वैयक्तिक ऐच्छिक करार आहे. त्यामुळे संमती घेणेकरीता परवानगी देणेचे कामकाज या कार्यालयाकडून केले जात नाही.असे माहिती अधिकाराच्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान गांधीनगर झोपडपट्टीत 1972 च्या दुष्काळात मराठवाड्यातील मजूरवर्ग सर्वाधिक येथे आला आणि स्थायिक झाला. गेल्या पन्नास वर्षांत दोन पिढ्या झाल्या, तिसऱ्या पिढीचे वास्तव्य आता आहे. गांधीनगर खासगी भूखंडावर वसलेले असून 2002 मध्ये सर्वेक्षण झाले होते. मात्र, अद्याप पुनर्वसन झालेले नाही.