भोसरीतील पीएमआरडीएचा अनागोंदी कारभार; नागरिकांचा आयुक्तांना घेराव
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) भोसरी सेक्टर क्रमांक 12 मधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या कमी उत्पन्न गट (एलआयजी) आणि अर्थिक दुर्बल गटाच्या (इडब्ल्यूएस) गृहनिर्माण संस्थांमधील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. रहिवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर या समस्यांची शुक्रवारी (दि.2)रोजी आयुक्त राहुल महिवाल यांनी पाहणी केली. या वेळी सुमारे 500 ते 800 लोकांनी एकत्र येत आयुक्तांना घेराव घालून आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.
सेक्टर क्रमांक 12 मध्ये नागरिक राहायला येऊन सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र; येथील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पाच महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे नागरिकांनी 16 प्रमुख तक्रारी लेखी निवेदनाद्वारे दिल्या होत्या. याबाबत आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही त्यातील किरकोळ समस्या सुटल्या होत्या. याबाबत नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या.
स्वच्छतागृहांतील पाण्याची गळती होऊन खालील सदनिकांमध्ये झिरपते, सदनिकांचे वॉटरप्रुफींग व्यवस्थित नाही , सर्वांना पार्किंगची सोय उपलब्ध नाही, स्वच्छतागृहाच्या खिडक्या व्यवस्थित नाहीत. पाणी पुरवठा महापालिकेकडे मात्र; थोड्या काळासाठी कमी दाबाने पाणी. पाणी समस्येबाबत पीएमआरडीए व महापालिकेचे एकमेकांवर आरोप,एलआयजी व इडब्ल्यूएस एकाच क्लस्टरमध्ये घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.
येथील रहिवासी असलेले अॕड. अतुल कांबळे यांनी सांगितले की, भोसरी सेक्टर क्रमांक 12 मधील गृहनिर्माण योजनेतील उद्यानाचे काम झाले नाही. खेळाचे मैदान विकसित झालेले नाही. एसटीपी अजून व्यवस्थित कार्यान्वित नाही. सुरक्षा व्यवस्था कच्ची असल्याने चो-यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचे नियंत्रण नसल्याने या भागात गुन्हेगारी वाढली आहे. सोलर व्यवस्था व्यवस्थित काम करत नाही. सदनिकांमधून पाणी गळती होत आहे.
भोसरी सेक्टर क्रमांक 12 येथे पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात आहे. काही काळ पाणी पुरवठा सुरळीत होतो. मात्र पुन्हा नागरिकांना कमी दाबाचा पाणीपुरवठा व अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी वाढल्यानंतर आयुक्त महिवाल यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर आदी उपस्थित होते. यावेळी रहिवाशांच्या तक्रारी सोडवू, असे आश्वासन महिवाल यांनी दिले.