अल्पवयीन विद्यार्थिनी काजल तुरूकमारे मृत्यू प्रकरणी शिक्षिकेला अटक करण्याची मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) शाळेत पेपर देत असताना काजल ही १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी आजारी पडली. संबंधित शिक्षिकेने तिला रुग्णालयात घेऊन न जाता घरी सोडले. मात्र, घरी कोणीच नसल्याने उपचाराला विलंब झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२) सकाळी आकाराच्या सुमारास बौध्दनगर येथील कै. नवनाथ साबळे या शाळेत ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षिकेवर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.काजल गोरख तुरुकमारे (वय १३,रा.भाटनगर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, काजल ही बौध्दनगर परिसरातील कै. नवनाथ दगडू साबळे शाळेत होती. मंगळवारी सकाळी शाळेत परीक्षेचा पेपर देत असताना तिची प्रकृती खालावली. यामुळे शिक्षिका काजलला घरी घेऊन गेली मात्र, तिची आई कामाला गेली होती. शिक्षिका काजलला घरी सोडून पुन्हा कामावर गेली. आई घरी येईपर्यंत मुलीची प्रकृती जास्त खालावली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता अर्ध्या तासाने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे काजलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि इतर कार्यकर्त्यांनी केला. तसेच कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत शिक्षण अधिकारी आणि पिंपरी पोलिसांकडे तक्रार केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
याबाबत शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, ‘‘घटना दुर्दैवी असून, यासंदर्भातील अहवाल घेतला आहे. हा अहवाल आयुक्तांसमोर सादर करून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.’’