धक्कादायक :भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च लाखावरून कोटींपर्यंत, मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्याची मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७. ५ कोटीपर्यंत वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अपना वतन संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात संघटनेने म्हंटले आहे की, अपना वतन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून ७. ५ कोटीच्या वर गेलेला निदर्शनास येत असून, त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दबावामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच माजी खासदार आढळराव पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. यावरून शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल याला दुजोरा मिळतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाहद्दीमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर शीतलबाग भोसरी येथे फूट ओव्हर ब्रिज / पादचारी पूलाच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम ७६,०९,५४९/ इतकी होती. त्यापैकी ७१,०५,०८७/ या रकमेस दि. ०१/०६/२०१२ रोजी तांत्रिक मान्यता घेण्यात आली. स्थायी समिती ठराव क्रमांक ३२७२ नुसार दि. ०९/०४/२०१३ रोजी निविदा स्वीकृतीस मान्यता देऊन दि. १३/०५/२०१३ रोजी मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांना कामाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मा. नगरसदस्य वार्ड क्रमांक ३४, गव्हाणे वस्ती भोसरी यांच्या दि. ९/०७/२०१३ च्या पत्रानुसार डिझाईनचे कारण देऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ राजकीय अट्टाहासापोटी व अधिकारी व ठेकेदार व राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने शीतलबाग येथील पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून ६ कोटींपर्यंत नेला. तसेच महापालिका ठराव क्रमांक ४३५ दि. १८/०१/२०१४ नुसार मान्यता घेतली व मा. स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १०१६७, दि. ३०/१२/२०१४ नुसार रक्कम रुपये ५,५७,७७,३५७/ च्या खर्चास मान्यता देऊन मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन याना दि. ०१/०१/२०१५ रोजी कामाचे आदेश देण्यात आले.
एवढेच नव्हे तर पुन्हा डिझाईनचे कारण मा. स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १५२६८, दि. १७/०२/२०१६ नुसार त्याच कामासाठी ७. ५ कोटीची मान्यता देण्यात आली. यामुळे लक्षात येते की, या कामामध्ये वेळोवेळी मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला आहे.
तसे पाहता या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिजची गरज आहे काय? याबाबत स्थळपाहणी करून स्थानिक नागरिकांची मते विचारत घेऊन हा पादचारी पूल बांधणे आवश्यक होते. जनतेचा कररूपी पैसे योग्य ठिकाणी जनतेच्या हितासाठी वापरणे गरजेचे होते. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टींचा कसलाही विचार न करता केवळ जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याच्या उद्देशानेच या कामाच्या खर्चामध्ये ४ ते ५ वेळा वाढ करण्यात आली. तत्कालीन स्थायी समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व राजकीय पुढारी, संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर भ्रष्टाचार करून जनतेची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, असे वतन संघटनेने या पत्रात म्हंटले आहे.