कोरोना संकटकाळात स्वखर्चाने दत्ता काकांनी उघडले अन्नछत्र ;तब्बल दहा हजार गरीबांना अन्नदान
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोनाच्या संकटकाळात रोजगार नसल्याने अनेक नागरिकांना उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या काळात कुणी बाहेर यायला धजावत नसताना मोरेवस्ती प्रभागातील नागरिकांसाठी माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता काका साने यांनी स्वखर्चाने अन्नछत्र सुरू केले आहे.त्याद्वारे आतापर्यंत सुमारे दहा हजार गरीब गरजू नागरिकांना अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे.काकांनी स्वखर्चाने सुमारे आठशे पोती गहू,सातशे पोती तांदूळ,गोडतेल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.माणुसकी जगात मेलेली नाही याचे उदाहरण म्हणून काकांनी केलेल्या कामाचे कौतुक सर्वसामान्य जनतेमधून करण्यात येत आहे.
मोरेवस्ती या भागात कामगार,कष्टकरी,बांधकाम मजूर आदी लोकांचा मोठा वर्ग वास्तव्यास आहे.सत्तर टक्के नागरिक येथे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत याशिवाय परप्रांतातून कामाच्या शोधात आलेल्या नागरिकांची मोठी वस्ती या भागात आहे. सदर नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम नसल्याने अनेकांची उपासमार होत आहे.शासनाच्या मदतीला अनेक नियम आणि कायदे आडवे येत असल्याने अशा नागरिकांपर्यंत मदत पोहोचत नाही.त्यामुळे आपल्या प्रभागातील कुणीही नागरिक उपाशी राहता कामा नये या भूमिकेतून काकांनी स्वखर्चाने अन्नछत्र सुरू केले आहे.त्यामध्ये अशा नागरिकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत आणि त्याकरिता काकांनी आपल्या कार्यकर्त्यांची फळी या कामासाठी लावली आहे.मुळातच काकांच्या परिवाराला वारकरी पंथाचा वारसा लाभला असून त्यांचे वडिल कै.बाबुराव साने यांनी वारकरी पंथासाठी स्वतःला वाहून घेतलेले होते.
अगदी तेच संस्कार काकांमध्ये उपजत आले आहेत.आणि समाजाचे दुःख ते आपले दुःख असे समजून काकांनी आजपर्यंत त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवलेला आहे.शहरातील अन्य प्रभागात नागरिक शासनावर अवलंबून असताना काकांनी आपले कुटुंब म्हणून नागरिकांना सांभाळले आहे. कुठल्याही क्षणी कुणालाही काहीही मदत लागल्यास काकांचे हक्काचे दार हे प्रत्येक जनसामान्यांसाठी खुले असते ज्याचा अनुभव प्रत्ययाला येत आहे.जोपर्यंत भोवतालची परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यथा शक्तीने नागरिकांना आपले हे अन्नछत्र सुरू राहील याची ग्वाही दत्ता काका साने यांनी दिली आहे.