बातम्या

भक्ती शक्ती येथे “शिवसृष्टी” व अण्णाभाऊ साठे स्मारक येथे “साहित्यसृष्टी” उभारण्याची मागणी

निगडी – येथील भक्ती शक्ती समुहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारण्याची मागणी निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांकडे केलेल्या मागणीत त्यांनी असे म्हणले आहे की, “निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्प व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक हे शहरातील नागरिकांसाठी पर्यटन स्थळ असुन शहरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात, येथे असणाऱ्या देशातील सर्वात उंच भारताच्या झेंड्यामुळे देशातील नागरिकांची संख्याही येथे दिवसेंदिवस वाढतच आहे, नुकतेच सुरू झालेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, याच चौकात सुरू असलेल्या भव्यदिव्य उड्डाणपुलामुळे व मंजुर असलेल्या मेट्रोमुळे या ठिकाणाला भविष्यात “राष्ट्रीय पर्यटन” स्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणाला “सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ” बनविण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ऐतिहासिक माहिती शिल्पातुन मिळावी यासाठी भक्ती शक्ती समुह शिल्प येथे “शिवसृष्टी” व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे “साहित्यसृष्टी” उभा करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

निगडीतील भक्ती शक्ती समुह शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची ऐतिहासिक भेट उतरविण्यात आली आहे तर समोरच असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकामुळे अण्णाभाऊंचे उत्कृष्ट साहित्य व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान याचे दर्शन होते, सर्वच महापुरुषांचा इतिहास सर्वसामान्य नागरिक व तरुण पिढीला होण्याची नितांत गरज आहे, याच मार्गावरून राज्यातील लाखो वारकरी पंढरपुर वारीला दरवर्षी जात असतात आणि आपले व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भक्ती शक्ती समुहास नतमस्तक होऊन ते पुढे जात असतात, शहरातील व राज्यातील नागरिकांना ऐतिहासिक दर्शन घडावे यासाठी येथे “शिवसृष्टी व साहित्यसृष्टी” उभा करण्याची गरज आहे त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही चांगली भर पडेल.

त्यामुळे लवकरात लवकर याची गांभीर्याने दखल घेऊन याठिकाणी भव्यदिव्य शिवसृष्टी व साहित्यसृष्टीचे काम सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा,असे त्यात नमुद केले आहे.

Share this: